सिल्लोड, तालुक्यातील उपळी परिसरात अंजना नदीपात्रातून व दिडगाव येथील पुर्णा नदीपात्रातून जेसीबी मशीनच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा करण्यात येत आहे.
उपळी व दिडगाव गावाच्या नदीपात्रातून दिवसा व रात्रीच्या वेळेस दररोज हजारो ब्रास वाळू अवैधरित्या बाहेर काढून तो ट्रॅक्टरद्वारे इतर ठिकाणी वाहून नेला जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. परिसरातील विविध ठिकाणी वाळू माफियांनी मोठमोठे वाळू साठे करून ठेवले
असल्याचेही समोर येत आहे. महसूल व पोलिस अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे कारवाया निर्भयपणे सुरू असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे.
दिवसा ढवळ्या सुरू असलेल्या या धाडसी वाळू चोरीमुळे नदीचा नैसर्गिक समतोल कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या वाळू उपशामुळे परिसरातील पाणी झपाट्याने खालावत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. या सर्व पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून महसूल विभाग व पोलिस प्रशासनाकडून तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वारंवार होत आहे. अवैध वाळू उपशावर कडक नियंत्रण न आणल्यास पुढील काळात परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
नदीची दिशा बदलण्याचा धोका :
महत्त्वाचे म्हणजे, परिसरातील एकाही वाळूपट्ट्याचा अधिकृत लिलाव झालेला नाही. तरीही सर्रास उपसा सुरू आहे. या अनियंत्रित उत्खननामुळे नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडून नदीची दिशा बदलण्याचा आणि भविष्यातील भीषण पाणीटंचाईचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.













